जिह्यातील १६२७ अंगणवाड्यांमध्ये एकाच वेळी ‘मशाल फेरी’

मशाल पेटवू, घरोघरी सुपोषण आणू दारीचा संदेश, सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन

वर्धा (जिमाका) : महिला व बाल विकास विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘एक जिल्हा, एक दिवस, एक थीम’ या संकल्पनेनुसार जिल्ह्यात आज एक अभिनव आणि व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील सर्व १६२७ अंगणवाडी केंद्रांमध्ये एकाच वेळी ‘मशाल फेरी’ काढून पोषण, आरोग्य, बालविकास आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.

‘मशाल पेटवू, घरोघरी सुपोषण आणू दारी’ या प्रभावी घोषणाव्यासह काढण्यात आलेल्या या मशाल फेरीत बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, विभागीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मशाल फेरीच्या माध्यमातून गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य, बालकांचे योग्य पोषण, वाढ व विकास, संतुलित आहार, प्र प्रथिनयुक्त आहार, आरोग्यविषयक काळजी आणि अंगणवाडीच्या विविध सेवांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. अंगणवाडी ही केवळ बालकांना सेवा देणारी संस्था नसून बालकांच्या सर्वांगीण विकासासोबतच माता व कुटुंबाच्या आरोग्य-पोषणासाठी महत्वाचे केंद्र आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

एक दिवस, एक जिल्हा, एक थीम या संकल्पनेमुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये एकाच दिवशी, एकाच उद्देशाने आणि एकसंघ पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाच्या सेवा आणि योजनांचा संदेश व्यापक स्तरावर नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली.

‘पोषण म्हणजे प्रगति, सुपोषित बालक म्हणजे सक्षम भविष्य’ हा विचार जनमानसात रुजविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी विविध घोषणावाक्ये, फलक आणि जनजागृतीपर संदेशांच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

जनसहभागातून सुपोषित वर्धेकडे वाटचाल

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, सेवांच्या गुणवत्तेत गतिमानता आणणे आणि जनसहभागातून महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १६२७ अंगणवाड्यांमध्ये एकाच वेळी पेटलेली ही मशाल केवळ जनजागृतीची नव्हे तर ‘सुपोषित बालक – सुदृढ कुटुंब – सक्षम समाज’ या संकल्पनेची मशाल ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *