राष्ट्रसंतांचा विश्वशांतीचा विचार आज अधिक प्रासंगिक

वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विश्वशांतीचा मांडलेला विचार आज अधिक प्रासंगिक ठरत आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक सुरमणी आशिष साबळे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रसंत विचार प्रतिष्ठान मानस मंदिरतर्फे १ ते ३० एप्रिल दरम्यान ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले होते. त्याचा आज मानस मंदिरात समारोप झाला.

स्टेट बँक मुंबईच्या आर्थिक शाखेचे उपाध्यक्ष असलेले आशिष साबळे हे शास्त्रीय गायक म्हणून पण परिचित आहेत. त्यांना संगीताचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यावेळी बोलतांना ते म्हणाले की राष्ट्रसंतांनी फार पूर्वी शांतिमंत्र देऊन ठेवला. त्याची महती आज अधिक पटत आहे. जगात सर्व दिशांनी अस्थिरता पसरत चालली आहे. वैरभाव तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर शांतिमंत्र आवश्यक ठरतो. त्याचा प्रसार हेच राष्ट्रसंतांना खरे अभिवादन ठरेल, असे साबळे म्हणाले.

यावेळी संस्थेचे सचिव विजय मंथनवार व हभप पुण्यदासजी चरडे यांच्या हस्ते साबळे यांचा सत्कार करण्यात आला. उत्सव समिती संयोजक मयूर हुमणे यांनी महिनाभर चाललेल्या कार्यक्रमाची माहिती अहवाल वाचनातून दिली. प्रथम राष्ट्रसंतांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. स्वागत सतीश जगताप व मारोती बरडे यांनी केले. कार्यक्रमास लक्षणीय संख्येत गुरुदेवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *