आर्वी : धावत्या राजकारणात आणि कार्यक्रमांच्या गडबडीत माणुसकी हरवली, अशी तक्रार नेहमीच ऐकू येते. मात्र कुरहा येथे घडलेल्या एका प्रसंगाने ही धारणा चक्क खोटी ठरवली. मतदारसंघातील कार्यक्रमासाठी आर्वीवरून अमरावतीकडे निघालेले खासदार अमर काळे यांनी रस्त्यावर पडलेल्या जखमी व्यक्तीकडे पाहताच आपली गाडी थांबवली आणि थेट मदतीसाठी धाव घेतली.
रस्त्यावर विव्हळणाऱ्या त्या जखमीची अवस्था पाहून क्षणाचाही विलंब न करता खासदारांनी घटनास्थळी उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या त्या व्यक्तीला पाहून त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. मदत पोहोचेपर्यंत त्यांनी घटनास्थळ सोडले नाही, तर जखमीच्या जवळच उभे राहून त्याला धीर देत राहिले.
काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तातडीने गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत खासदार अमर काळे घटनास्थळावर ठामपणे उभे राहिले. जखमी सुरक्षितपणे रवाना झाल्यानंतरच त्यांनी आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली.
ही घटना केवळ एक अपघाताची दखल नव्हे, तर लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदारीची जिवंत साक्ष ठरली. सत्तेच्या गडबडीतही सामान्य माणसाच्या वेदनेला ओळखून त्याच्या मदतीसाठी धावून जाणे, हीच खरी जनतेची सेवा असल्याचे खासदार अमर काळे यांनी कृतीतून दाखवून दिले. अडचणीच्या प्रसंगात कोणीतरी येईल, या आशेवर असलेल्या सामान्य माणसासाठी या घटनेने एक विश्वास निर्माण केला आहे.