गृह विभागाचा शासन आदेश जारी,पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या प्रयत्नांना यशवर्धा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील दारूबंदी संदर्भात वस्तुस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे मांडली होती. जिल्ह्यात ३० एप्रिल १९७५ मध्ये दारूबंदी करण्यात आली. दरवर्षी दारूबंदी अंतर्गत शेकडो प्रकरणे दाखल होतात. तसेच पोलिस विभागाकडून देखील सतत विशेष मोहीम राबविण्यात येते. मागील दहा वर्षांचे सन २०१४-२०२४ चे अवलोकन केल्यास दारूबंदीचे ९३ हजार ५५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ५१ हजार ३४० गुन्ह्यांचा निकाला लागला असून ६७४ प्रकरणात गुन्हा सिद्धी झाली तसेच ५० हजार ६६६ गुन्हे निर्दोष सुटल्याचे सांगत आज अन्य गुन्हे देखील वाढले असून गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञान वापरत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
वर्धा येथे लघु न्याय वैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुसज्ज निवासी प्रशिक्षण केंद्रासह मोबाईल प्रकरणांसाठी स्पेशल एक्सलेंस सेंटर निर्माण करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे यश आले आहे.
राज्याच्या गृह विभागाने ४ मार्च रोजी तसा शासन आदेश निर्गमित केला आहे. वर्धा येथे लघु न्याय वैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सुसज्ज निवासी प्रशिक्षण केंद्रासह मोबाईल प्रकरणासाठी स्पेशल एक्सलेंस सेंटर स्थापन होणे आवश्यक असल्याची बाब पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या मागणीला प्रतिसाद देत वर्धेत लघु न्याय वैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सुसज्ज निवासी प्रशिक्षण केंद्रासह मोबाईल प्रकरणासाठी स्पेशल एक्सलेंस सेंटर स्थापन करण्याचा निर्णय मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार ४ मार्च रोजी गृह विभागाने शासन आदेश निर्गमित केला आहे. प्रयोगशाळेत ६७ पदे राहणार आहे.