१ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा जनगणना २०२७ कार्यक्रम

वर्धा : ‘जनगणना २०२७’ चा कार्यक्रम जाहीर झाला असून देशातील ही पहिलीच डिजिटल जनगणना आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आष्टी तालुक्यातील नागरिकांनी स्वयंगणना करण्यासाठी सहकार्य करावे असे, आवाहन तहसीलदारांनी केले आहे. आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनगणनेसाठी एकूण १४० प्रगणक, २४ पर्यवेक्षक व २ फील्ड ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०११ च्या जनगणनेनंतर तब्बल १५ वर्षांनी ही जनगणना होत असून जनगणनेतील माहितीचा उपयोग देशाच्या विकासाकरिता व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता उपयुक्त ठरत असते, असे तहसीलदार यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी १ मे ते १५ मे या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत वेबपोर्टलवर भेट देऊन आपली माहिती भरावयाची आहे, यात कुटुंब प्रमुखाचे नाव, १० अंकी मोबाईल क्रमांक आदीचा समावेश आहे. या पोर्टलवर विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

दुसऱ्या टप्प्यात जेव्हा प्रगणक घरभेटीसाठी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंदवली जाईल. यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी ‘ॲप’ वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टलमध्ये भरलेली नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे. नागरिकांनी आपल्या वेळेनुसार १ ते १५ मे दरम्यान घरबसल्या स्वयंगणना पोर्टलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन आष्टी तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *