डॉ. किरण पाटील यांच्या ‘सहज’ प्रणालीची दखल

‘द्वितीय सेवा हक्क दिनी’ सह्याद्री अतिथीगृहात होणार सन्मान
वर्धा : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सध्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी राबवलेल्या ‘सहज प्रणाली’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल २८ एप्रिल रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या वतीने ‘द्वितीय सेवा हक्क दिन’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आयोजित या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त भूषविणार असून, राज्याचे मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

काय आहे ‘सहज प्रणाली’
डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना, सामान्य नागरिकांना शासकीय सेवा विहित वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी ‘सहज प्रणाली’ विकसित केली होती. या उपक्रमामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येऊन नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचले. हा पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरला असून, इतर जिल्हाधिकाऱ्यांनाही यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोगाकडून डॉ. पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

२८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात हा गौरव सोहळा संपन्न होईल. राज्याच्या मुख्य सचिवांच्या हस्ते डॉ. किरण पाटील यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण (निर्धार) यांनी निमंत्रणाद्वारे डॉ. किरण पाटील यांना उपस्थितीचे आवाहन केले आहे. डॉ. पाटील यांच्या या यशामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *