शिवीगाळ प्रकरण, कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून आंदोलन

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याच्या घटनेचे पडसाद सोमवारी १९ जानेवारी रोजी उमटले. या प्रकाराच्या निषेधार्थ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला.

यावेळी नगर परिषदेच्या मुख्य द्वारासमोर निदर्शने करण्यात आली. १६ जानेवारी रोजी प्रकाश चामटकर यांनी नगर परिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप आहे. त्यांच्या पत्नी सध्या नगर परिषदेच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या असून, संबंधित प्रभागात तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्याच्या मागणीवरून हा वाद झाला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याने प्रकरण अधिक चिघळले.

या घटनेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी वर्धा शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे कार्यालयीन शिस्त व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे सांगण्यात येत आहे. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी काळी फित लावून कर्मचाऱ्यांनी निदर्शन केली. यावेळी दीपक रोडे, निखील लोहवे, चंदन महत्ताने, अक्षय पुनवटकर यांच्यासह कमचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *