वर्धा : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत येथे शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित व त्यांतर्गत आजनगाव जनजागृती करण्यात आली. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान अंतर्गत पुढील तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक व जनजागृती करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने रुंद वरंबा तयार करणे, बेडवर टोकण पद्धतीने लागवड, शून्य मशागत, कमीत कमी मशागत, आंतरपीक पद्धती वरील विषयावर प्रात्यक्षिक व जनजागृती करण्यात आली. बेड तयार करणे, टोकण यंत्राद्वारे लागवड व शून्य मशागत या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी खर्चात व कमी श्रमात शेती कशी करावी, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना टोकण यंत्राद्वारे अचूक व समांतर लागवड तसेच शून्य मशागतीमुळे मातीची सुपीकता टिकवून ठेवणे व खर्चात बचत कशी होते, यावर मार्गदर्शन करण्यात आले. ही खरीप पूर्व हंगाम नियोजन व जनजागृती ही मोहीम रमाकांत दिलीप कांबळे उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी, रवींद्र गुलाबराव उघाडे तालुका कृषी अधिकारी आर्वी, विजय नथुजी खोडे मंडळ कृषी अधिकारी खरांगणा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. याचा गावकरी व महिला शेतकरी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोशन राऊत कृषी सहाय्यक, रीना शिवशंकर डेंगरे कृषी ताई, सौरभ प्रदीपराव लखवाडे समूह सहाय्यक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शेतीतील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा प्रत्यक्ष शेती व्यवसाय मध्ये उपयोग करण्याचा नवीन कौशल्य या नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा २ या प्रकल्पाअंतर्गत आत्मसात केले. त्यामुळे आम्हाला निश्चित फायदा होईल, असे या प्रात्यक्षिका करिता आलेल्या शेतकरी महिला यांनी प्रतिक्रिया नोंदवली.