वर्धा (जिमाका) : खरीप हंगाम सन २०२६-२७ साठी जिल्ह्यातील पिकनिहाय ४ लाख १९ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून सोबतच बियाणे मागणी व रासायनिक खतांचे नियोजन सुद्धा कृषी विभागामार्फत निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कापूस २ लाख २४ हजार ९९६ हेक्टर, सोयाबीन १ लाख २४ हजार ५०० हेक्टर, तूर ६५ हजार ६१० हेक्टर व मका २ हजार ५०० हेक्टर, व इतर पिकांसाठी ५ हजार ७२९ हेक्टर क्षेत्रावर पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. मागील २ वर्षांपासून चारकोट रॉटमुळे सोयाबीन पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी कमी करून १ लाख २४ हजार ५०० हेक्टरवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोयाबीनचे हे कमी केलेले क्षेत्र मका, कापूस आणि तूर या पिकांकडे वळविण्यात आले आहे. मका पिकांचे क्षेत्र ७६ हेक्टरवरून यावर्षी २ हजार ५०० हेक्टर पर्यंत वाढविण्यात आले आहे. कापूस मागील पिकाचे मागील वर्षाच्या २ लाख १६ हजार ८२३ हेक्टर वरून यावर्षी २ लाख २४ हजार ९९६ हेक्टर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तर तुरीचे ५९ हजार ४९८ वरून ६५ हजार ६१० हेक्टर नियोजन करण्यात आलेले आहे.
खरीप हंगामासाठी १ लाख १७ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये युरिया ३४ हजार ५०० मेट्रीक टन, डीएपी १४ हजार ३०० मेट्रीक टन, व संयुक्त खते ३५ हजार ५०० मेट्रीक टनाचे नियोजन करण्यात आले असून आज अखेर जिल्ह्यात ५५ हजार २२२ मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे.
शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे व शिफारशीनुसार खतांचा वापर करावा. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पेरणी करावी. पावसाच्या आगमनानुसार वेळेवर पेरणी करावी. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक/कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.