पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते ८ उमेदवारांना नियुक्ती आदेश

वर्धा (जिमाका) : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खुन प्रकरणाच्या पीडीत कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्याचे धोरण आहे. त्यानुसार रिक्त जागांची उपलब्धता आणि लाभार्थी उमेदवारांच्या पात्रतेनुसार जिल्ह्यातील अनुसूचित जाती कुटुंबातील ८ उमेदवारांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्ह्यात पात्र ३० उमेदवारांपैकी काही नियुक्त्या इतर जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार आदी उपस्थित होते.

नियुक्त्या देण्यात आलेल्या ८ उमेदवारांमध्ये पुजा आनंदराव रनधिर, राहुल ज्ञानेश्वर वाहने, निलेश वसंतराव हातमोडे, स्वप्नील सुरेश ओंकार, प्रगती गजानन देवतळे, विकास दौलतराव शंभरकर, शुभम रमेश घोरपडे, मन्टी अशोकराव तायवाडे या उमेदवारांचा समावेश आहे. समाजकल्याणच्या निवासी शाळा,वसतीगृहांमध्ये वेगवेगळ्या पदांवर हे उमेदवार कार्यरत राहणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अंकेश केदार यांनी केले. संचलन समाजकल्याण निरीक्षक शरद निबुदे यांनी केले. कार्यक्रमास उमेदवारांसह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *