शहरातील अवैध व्हिडीओ गेम पार्लरवर छापा

चार लाखांचा मुद्देमाल जप्त, शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई
वर्धा : शास्त्री चौकातील कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या अवैध व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी व्हिडीओ गेम मशिनसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शास्त्री चौकातील कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकला. शासकीय चारचाकी वाहनाने पोलीस गेले असता पोलिसांचे वाहन पाहताच अनेक जण पळून गेले. गाळ्यामध्ये जावून पाहणी केली असता तेथील इसमास ताब्यात घेवून विचारपूस केली असता रोहीत किशोर अरक (वय ३२) रा. हिंगणघाट फैल, पुलगाव असे नाव सांगितले. व्हिडीओ गेम पार्लरबाबत चौकशी केली असता हा गाळा प्रवीण वाघमारे रा. हिंगणघाट याने किरायाने घेतलेला असून त्याच्या सांगण्यावरून व्हिडीओ गेम पार्लर चालवित असल्याची माहिती पुढे आली. व्हिडीओ गेम पार्लरच्या परवाना नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी १० व्हिडीओ गेम मशिन, मोबाईल, खुर्च्या, ६ हजार ८०० रुपयांसह चार लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रोहित अरक रा. पुलगाव, प्रवीण वाघमारे रा. हिंगणघाट या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, गजेंद्र धर्मे, नरेंद्र कांबळे, प्रशांत वंजारी, श्रावण पवार यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *