कॅन्सरवर उपचारापेक्षा कॅन्सर होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे : खासदार अमर काळे

वर्धा (जिमाका) : जगात अनेक प्रकारचे कॅन्सर आहे. या आजारावर कायमस्वरुपी उपचार नाही. यापैकीच एक असलेल्या गर्भाशयाच्या कॅन्सरपासून महिलांना वाचविण्यासाठी लसीकरण हा उपचार आहे. कॅन्सरवर उपचार होण्यापेक्षा कॅन्सर होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिलांनी या कॅन्सरपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन खासदार अमर काळे यांनी केले.

महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरची लागण व त्या आजाराचे गांभीर्य व परिणाम लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅनकाईंड फार्मा व स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच खासदार अमर काळे यांच्या पुढाकाराने समुद्रपूर तालुक्यातील १२ गावात कॅन्सरमुक्त लसीकरण अभियान राबविण्यात आले. अभियानांतर्गत तालुक्यातील किन्ही, कवठा, निंभा, आरंभा, करुड, पवनगाव व नारायणपूर या सात गावात शंभर टक्के लसीकरण करुन ही गावे संपुर्णतः कॅन्सरमुक्त करण्यात आले. लसीकरण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे या गावातील सरपंच, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी व स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनचे स्वयंसेवकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा.काळे बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, मॅनकाईंड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल अरोरा, कंपनी दायित्व निधीचे महाव्यवस्थापक अखिलेश डीमरी, स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. दिपीका चांदोक, उपाध्यक्ष अभिषेक चावला, इंद्रेश चव्हाण, आलोक पांडे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *