प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : विरुळ आकाजी परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामध्ये काही प्रमाणात गारही झाली. दरम्यान, पुलगाव – आर्वी मार्गावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
विरुळ शिवारात शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसादरम्यान बोराच्या आकाराची गार झाली. यावेळी वादळी वाऱ्याने आर्वी पुलगाव रोडवरील विरुळ गावाजवळ दोन मोठे बाभळीचे झाड रोडवर पडल्याने अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्हीही बाजूंनी चारचाकी, मोटरसायकल वाहनांची रांग लागली होती.
जैन ईरिगेशनचे पाईपलाईनचे काम सुरू असताना तेथून दोन जेसीबी बोलावून झाड रस्त्याच्या कडेला करत रस्ता सुरळीत करण्यात आला. परिसरातील अनेकांचे पानठेले, घरावरील टिना, अनेकांचे झोपडेही उडाले. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.