सिंदी रेल्वे नगरपरिषदेच्या कारवाईत सर्वसामान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान!, नगर परिषद प्रशासनाकडून नियमांना केराची टोपली; पीडिताची जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी धाव
(अभय बेदमोहता) प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू : तालुक्यातील सिंदी (रेल्वे) येथे स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली अतिक्रमण काढताना नगर परिषद प्रशासनाने वैयक्तिक आकसापोटी एका गरिबाचे घर आणि दुकान उद्ध्वस्त केल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघडकीस आला आहे. या कारवाईत पीडित नागरिकाचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, प्रशासनाने केवळ ‘निवडक’ लोकांवरच कारवाई केल्याचा आरोप करत तक्रारदाराने आता दि. २ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. सिंदी रेल्वे येथील प्रभाग क्र. १५ मधील रहिवासी सुधाकर विठोबाजी वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ मार्च २०२६ रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जेसीबीसह त्यांच्या घरावर धडक दिली.
कोणतीही पूर्वसूचना न देता आणि जागेची अधिकृत मोजणी न करता, वाघमारे यांच्या घराचा काही भाग आणि दुकानाचे शटर पाडून टाकले. विशेष म्हणजे, कारवाईनंतर निघालेला मलबा आणि कचरा त्यांच्याच घरासमोर आणि नालीत टाकून देण्यात आला, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असा पीडित सुधाकर वाघमारे यांनी निवेदनात खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी यापूर्वी नगरपरिषदेतील भ्रष्टाचार आणि अनियमितेबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून मुख्याधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईत प्रशासनाचा दुजाभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. वाघमारे यांच्या घराशेजारीच असलेल्या इतर मोठ्या प्रस्थापितांच्या घरासमोरील अतिक्रमणांना मात्र प्रशासनाने स्पर्शही केला नाही.
केवळ सामान्य नागरिकाला लक्ष्य करून ‘आम्ही कारवाई करतोय’ असे भासवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला असल्याचे निवेदनात नमूद आहे. घरासमोर टाकलेल्या मलब्यामुळे आणि तोडफोड झालेल्या नालीमुळे सध्याचे परिस्थितीत सांडपाणी साचले आहे. ‘दुकानातील मालाचे नुकसान झालेच, पण आता दुर्गंधीमुळे माझ्या कुटुंबाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे,’ अशी कैफियत वाघमारे यांनी मांडली आहे. सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. तसेच नुकसानीची भरपाई म्हणून २ लाख रुपये त्वरित मिळावेत. व घरासमोर साचलेला मलबा हटवून नालीची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणात मा. जिल्हाधिकारी, वर्धा काय भूमिका घेतात आणि पीडित सुधाकर वाघमारे यांना न्याय मिळतो काय? याकडे संपूर्ण सिंदी शहरवासियांचे लक्ष लागले आहे.