जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पालकमंत्री भोयर यांचा बुस्टर डोज

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ च्या लाभा पासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील ११८१६ शेतकऱ्यांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ६०.३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसा शासन आदेश ३१ मार्च रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नैसर्गिक आपत्ती व दुष्काळाच्या झळा बसलेल्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र सदर योजनेपासून वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज घेतलेले शेतकरी वंचित होते. या शेतकऱ्यांना देखील कर्ज माफीचा लाभ मिळावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शासन स्तरावर प्रयत्न आरंभिले होते. जिल्हा सहकारी बँकेतून ११८१६ शेतकऱ्यांनी ६०.३४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु शासनाच्या कर्ज माफी योजनेत समावेश नसल्याने सदर शेतकरी लाभापासून वंचित होते. परिणामी या शेतकऱ्यांना अन्य बँकेतून कर्ज मिळणे देखील कठीण झाले होते. तसेच अनेक कर्जधारक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांना देखील कर्ज माफीचा लाभ मिळाला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *