महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी जबाबदारी पार पाडली. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरपालिकेच्या निवडणुकांना लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे स्पष्ट केले. नगरपालिका ही लोकशाहीची मूलभूत रचना आहे. हीच लोकशाहीची खरी पायाभरणी मानली पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नगरपालिकांमधूनच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सुटतात. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दिल्या जातात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. मतदान करणे हे केवळ अधिकार नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मी स्वतः मतदान करून या कर्तव्याची पूर्तता केली आहे, असे सांगत त्यांनी राज्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.