खासदार अमर काळे यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे मागणीभारत सरकार व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी घोषित केल्यानुसार एलपीजी गॅस, पेट्रोल, डीझेल इत्यादी वस्तूंचा देशात कोणताही तुटवडा नाही. परंतु असे असतांनाही खाजगी व्यावसायिक उदा. कॅटरिंग, हॉटेल व्यावसायिक यांना मिळणारे एलपीजी गॅस सिलिंडर देणे बंद केले आहे. त्यामुळे खासदार अमर काळे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र लिहून व्यावसायिकांना एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती केली आहे.
सध्या चालू असलेल्या इराण-इस्राईल व अमेरिका यांच्यातील युद्धामुळे देशात इंधन पुरवठ्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. पेट्रोल पंपावर वाहन धारकांना पेट्रोल मिळत नाही, मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत, घरगुती सिलिंडर धारकांना सिलिंडर मिळत नाही त्यांनाही गॅस एजन्सी समोर तासनतास सिलिंडरकरिता रांगा लावव्या लागत आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढून राज्यातील छोटे दुकानदार, हॉटेल चालक, खानावळी चालविणारे व कॅटरींग व्यवसाय करणारे यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आलेला आहे.
केंद्र व राज्य सरकारचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर मुलाखती देतांना देशात पेट्रोलियम पदार्थाची मग त्यात गाडीमध्ये भरावयाचे पेट्रोल डीझेल व स्वयंपाकाचा गॅस याची कसलीही कमतरता देशात नाही असे वक्तव्य करतात. असे असतांना महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाने दि. २०.३.२०२६ रोजी एक परिपत्रक काढून खाजगी हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार व कॅटरींग व्यवसाय करणारे यांना एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे हॉटेल चालक, खानावळी व कॅटरींग व्यवसाय हे बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत. अनेक लोकांनी आपले व्यवसाय बंद केले आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर अवलंबून असणारे कामगार व कारागिर यांचे रोजगार गेल्याने त्यांचे समोर कुटुंबाच्या उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व वैद्यकीय सुविधा याबाबतचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व लोकांनी खासदार अमर काळे यांची भेट घेऊन आपली व्यथा खासदार महोदयांकडे व्यक्त केली. खासदार महोदयांकडे आपली व्यथा व्यक्त करतांना या लोकांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रु तरळत होते. खासदार अमर काळे यांनी संपूर्ण समस्येची माहिती घेऊन तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेशी संपर्क साधला व जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याबाबत माहिती घेतली. महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांनी वेळोवेळी माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार देशात इंधन व एलपीजी गॅस याचा पुरेसा साठा असल्यामुळे खासदार अमर काळे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना तात्काळ पत्र लिहून पुरवठा बंद करण्यात आलेल्या खाजगी व्यावसायिक, छोटे मोठे हॉटेल मालक, कॅटरींग व्यवसाय करणारे यांची व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगार कारागिरांच्या व्यथा लक्षात घेता यांना सुद्धा व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात यावा अशी विनंती केली.