पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज करीता संरक्षण मंत्रालयाकडून शिफारस करणेबाबत खासदार अमर काळे यांनी राजनाथसिंग यांची भेट

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज करीता संरक्षण मंत्रालयाकडून शिफारस करणेबाबत खासदार अमर काळे यांनी राजनाथसिंग यांची भेट घेतली.

संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे विभागाशी चालू असलेल्या चर्चेत खासदार अमर काळे यांनी पुलगाव-आर्वी या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करून हा मार्ग वरुड पर्यंत दिल्ली लाईनला जोडण्याबाबत तसेच रेल्वे संबंधी असलेल्या मतदार संघातील विविध अडचणी लोकसभेमध्ये आज दि. १६.०३.२०२६ रोजी रेल्वे विभागाशी चालू असलेल्या चर्चेमध्ये मांडून सरकारचे लक्ष वेधण्याकरीता खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्रालयाविषयी चालू असलेल्या चर्चेत हा विषय मांडला होता. पुलगाव-आर्वी हा मार्ग ब्रॉडगेज करून हा मार्ग वरुड पर्यंत वाढविल्यामुळे जशी आर्वी-आष्टी-कारंजा-वरुड या भागातील लोकांना प्रवासाकरीता रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. एवढेच नव्हेतर विशेष म्हणजे सद्य:स्थितीत पुलगाव मिलिट्री डेपो आणि मध्यप्रदेशातील आमला मिलिट्री डेपो यांच्यातील दारुगोळा भांडाराची वाहतूक करतांना व्हाया नागपूर जावे लागते व हे अंतर १०५ कि.मी. ने जास्त असून हा मार्ग सुद्धा सुरक्षित नसल्याबाबत अनेकदा मिलिट्रीकडून सुचविण्यात आले. याउलट पुलगाव ते आमला या दोन डेपो दरम्यान केंद्रीय दारुगोळा भांडारातील वाहतूक करण्याकरीता पुलगाव-आर्वी-वरुड हा मार्ग अतिशय सुरक्षित असल्याचे केंद्रीय दारुगोळा भांडाराकडून सुद्धा सांगण्यात आले.

सन १९७१ मध्ये युध्दाच्या काळात केंद्रीय दारुगोळा भांडार पुलगाव हे रडावर असल्याने येथील दारुगोळा भांडार आमला येथे तात्काळ हलविणे गरजेचे झाले होते व त्यावेळी नागपूर मार्गे वाहतूक करणे सुरक्षित नव्हते. परंतु पुलगाव-आर्वी-वरुड हा रेल्वे मार्ग नसूनही हाच मार्ग वाहतुकीकरीता सुरक्षित असल्याने व व्हाया नागपूर मार्गपेक्षा हे अंतर सुद्धा १०५ कि.मी. ने कमी असल्याने नाईलाजास्तव केंद्रीय दारुगोळा भांडार पुलगाव येथील सामुग्री रस्ता वाहतूक मार्गाने आमला येथे हलविण्यात आली होती. वरील बाबींमुळे पुलगाव-आर्वी-वरुड हा रेल्वे मार्ग केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर पुलगाव व आमला हे दोन केंद्रीय दारुगोळा भांडार या मार्गामुळे सुरक्षित व कमी अंतराने जोडले जाणार असून हा रस्ता अत्यंत सुरक्षित आहे. या कारणास्तव खासदार अमर काळे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांची भेट घेऊन पुलगाव ते आर्वी या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करुन हा मार्ग पुढे वरुड पर्यंत वाढवून दिल्ली लाईनला जोडण्याकरीता केंद्रीय संरक्षण मंत्रालयानी या मार्गाची शिफारस करावी अशी विनंती पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटीत चर्चा करुन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांना केली.

केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी खासदार अमर काळे यांनी दिलेल्या पत्राची व केलेल्या चर्चेतून संपूर्ण बाबीची माहिती घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या दृष्टीने हा मार्ग फार महत्त्वाचा आहे. या मार्गामुळे या दोन मिलिट्री डेपोमधील अंतर १०५ कि.मी. ने कमी होऊन दोन्ही डेपोमधील दारुगोळा वाहतूक सुरक्षित होणार आहे. याबाबत त्यांची खात्री पटल्याने याबाबत निश्चित शिफारस करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार अमर काळे यांना देण्यात आले. राजनाथसिंग यांनी चर्चा करतांना खासदार अमर काळे यांची मतदार संघातील विकासाबाबतच नव्हेतर त्यासोबतच देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही असलेली दूरदृष्टी बाबत त्यांचे कौतुक केले व आपल्या प्रयत्नाला व पाठपुराव्याला माझ्या सुद्धा पाठपुराव्याची व शिफारशीची सतत जोड असेल याबाबत खासदार अमर काळे यांना आश्वस्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *