जिल्हास्तरीय शांतता समितीची सभा,सण उत्सव शांतते साजरे करण्याचे आवाहनवर्धा (जिमाका) : येत्या दोन महिन्याच्या काळात जिल्ह्यात विविध समाजाच्यावतीने सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहे. सोबतच रॅलीचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्सवादरम्यान व मंडळांच्या रॅलीमध्ये कोणतेही व्यत्यय येऊ नये व शांततेत उत्सव पार पाडण्यासाठी उत्सवाच्या ठिकाणी व प्रमुख रस्त्याचे मार्ग अतिक्रमणमुक्त ठेवावे व संबंधित परिसरात स्वच्छता ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मती सी यांनी दिल्या.
येत्या दोन महिन्याच्या काळात जिल्ह्यात रामनवमी, रमजान ईद, गुढीपाडवा, झुलेलाल जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे उत्सव, जयंती साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय शांतता समितीच्या बैठक घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आदी उपस्थित होते.
उत्सवादरम्यान अतिक्रमणामुळे आयोजित रॅलीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नगरपालिकांनी मुख्य मार्ग तसेच मुख्य चौकातील अतिक्रमणे काढण्याची मोहिम राबवावी. पोलीस, वाहतूक विभागांनी पार्कीगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. विद्युत विभागाने सणउत्सव काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांनी सुध्दा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी रॅलीमध्ये उपद्रवी व्यक्ती सहभाग घेणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
डीजेच्या अतिआवाजामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. डीजेच्या आवाजाची तीव्रता जास्त होत असल्यास डीजे वापराची परवानगी घेणाऱ्या संचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पोलिस विभागाला दिली.
सण उत्सव काळात शहरांमधून जडवाहतूक होणार नाही याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी करावे. तालुका स्तरावरील शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करून आयोजकांशी समन्वय साधावा. अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे सुरक्षेवर ताण पडत आहे. नुकतीच १४२ पोलिस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रीया झाली असून निवड झालेले पोलिस रुजु झाल्यास त्यांची सेवा घेण्यात येईल, असे सौरभ अग्रवाल यांनी सांगितले. सण उत्सवासाठी आयोजकांनी पोलिस विभागाला सहकार्य करावे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. प्रास्ताविक अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी केले. सभेला तालुक्यातील शांतता समितीचे अध्यक्ष, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.