सेलूतील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यूप्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,सेलू : तालुक्यातील वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या सेलडोह नजिकच्या खुर्ची कंपनीजवळ दि. ३ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजताचे दरम्यान दुचाकी व कार यांच्यात भीषण अपघात झाला. यात सेलू येथील जोशीनगर निवासी ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीचे नाव अरुण थाटे (वय ५०) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थाटे हे त्यांच्या पॅशन प्रो क्र. एमएच ३२ ई ४२१५ या दुचाकीवरून सकाळी ५.४५ वाजताचे दरम्यान सेलू जोशीनगर येथून होळी निमित्त रंगोत्सवासाठी नागपूरला जाण्यासाठी निघाला होता. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच चालले होते. रंग उधळण्याऐवजी रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन या जगातून अरुणला बाद करण्यासाठी त्याच वेळी मागून येणाऱ्या किया सेल्टोस क्र. एमएच ४९ सीडी ४६७८ या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की थाटे हे दुचाकी वाहनासह दूरवर फेकल्या गेले. यात ते गंभीर जखमी झाले.
घटनास्थळासमोरच होळी सणानिमित्त तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आल्याने तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेले पोलीस शिपाई स्वप्नील बसू यांनी मोठा आवाज ऐकताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ॲम्बुलन्स बोलावली. जखमींना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपस्थित डॉक्टरांनी तपासणीअंती अरुण थाटे यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच सिंदी रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.