प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे सेलू : शेतातील पिकाची राखण करण्यासाठी जात असलेल्या एका २५ वर्षीय तरुण शेतकऱ्यावर रानडुक्कराने भीषण हल्ला चढवल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास बोरधरण जवळील बोरी (कोकाटे) परिसरात घडली. या हल्ल्यात विकास मारोती सरमाके हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विकास सरमाके याने ठेक्या बटईने एकाची शेती कसायला घेतली आहे. सध्या जंगली प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने, पिकांच्या राखणीसाठी (जागलीसाठी) तो रात्री ९ वाजता शेतात जात होता. वाटेतच दबा धरून बसलेल्या रानडुक्कराने अचानक विकासवर हल्ला केला. रानडुक्कराच्या धडकेने विकास शेजारीच असलेल्या प्रदीप तरोडकर यांच्या शेतात जाऊन पडला. रानडुक्कर सातत्याने हल्ला करत असतानाही विकासने हिम्मत न हारता मोठ्याने आरडाओरड केली. त्याच्या आवाजामुळे गावातील नागरिक तातडीने मदतीला धावून आले, ज्यामुळे रानडुक्कराने तिथून पळ काढला आणि विकासचे प्राण वाचले.
हल्ल्यात विकासच्या अंगावर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमा इतक्या गंभीर आणि खोलवर होत्या की सुरुवातीला टाके लावणेही कठीण झाले होते. डॉक्टरांनी रात्रभर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला तूर्तास सुटी दिली असून, तीन दिवसांनंतर पुन्हा तपासणीसाठी बोलावले आहे.
विकास हा त्याच्या घरातील एकमेव कमावता पुरुष आहे. त्याच्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. मात्र, या हल्ल्यातील जखमांमुळे डॉक्टरांनी त्याला किमान तीन महिने कोणतीही कष्टाची कामे न करण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि उपचाराचा खर्च कसा पेलणार, असा गंभीर प्रश्न सरमाके कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने या घटनेचा पंचनामा करून विकास सरमाकेला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.