प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : भारत सरकारने सादर केलेले व्हीबी जी राम जी (विकसित भारत – रोजगार व उपजीविका हमी अभियान – ग्रामीण) या विषयावर भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी व्हीबी जी राम जी च्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्य पदी देवळीचे आमदार राजेश बकाने यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या विधेयकांतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी १२५ दिवसांचा रोजगार आता मिळणार आहे.
विकसित भारत – रोजगार व उपजीविका हमी अभियान – ग्रामीण योजना ग्रामीण भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरत आहे. रोजगार, पायाभूत सुविधा आणि उपजीविकेच्या संधींमध्ये मोठा बदल यामुळे घडणार आहे. विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेने हे एक ठोस पाऊल मानले जात आहे. या नव्या कायद्यामुळे ग्रामीण भागात सन्मानजनक रोजगाराची हमी मिळणार आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.