ग्रामीण भागात दर्जाहीन खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री

अभय बेदमोहता,प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:सेलू : ग्रामीण भागातील किराणा दुकानदार व इतर विक्रेते शहरातून किंवा सप्लायरकडून मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ खरेदी करतात. मात्र, ग्रामीण भागात या मालाची अपेक्षित विक्री वेळेत होत नसल्याने अनेकदा मुदत संपल्यानंतरही तोच माल विक्रीसाठी ठेवला जात असल्याचे चित्र आहे. परिणामी, दर्जाहीन व कालबाह्य अन्नपदार्थ नागरिकांच्या पोटात जात असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ब्रेड, पाव यांसारख्या पदार्थांची टिकवणूक क्षमता केवळ २४ ते ४८ तासांची असते.

तरीही ग्रामीण भागात हे पदार्थ सात ते आठ दिवस विक्रीस ठेवले जात असल्याचे दिसून येते. तसेच टोस्ट, खारी बिस्किटे यांसारखे पदार्थ महिनाभर साठवून ठेवले जात असल्याने त्यांना बुरशी लागणे किंवा ते कुजण्याची शक्यता वाढते.

अन्न सुरक्षा व मानक कायद्यानुसार प्रत्येक पॅकबंद खाद्यपदार्थावर उत्पादकाचे नाव, परवाना क्रमांक, उत्पादन दिनांक व अंतिम वापर तारीख नमूद असणे बंधनकारक आहे. मात्र, स्थानिक पातळीवर तयार होणारे चिप्स, कुरकुरे, फरसाण आदी पदार्थांच्या पाकिटांवर कोणतीही माहिती दिलेली नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना त्या पदार्थांची गुणवत्ता व सुरक्षितता तपासण्याचा कोणताही आधार राहत नाही.

या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असून, ग्रामीण भागात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांची नियमित तपासणी करून दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच नागरिकांनीही संशयास्पद, उघड्यावर किंवा माहिती नसलेल्या पाकिटांतील खाद्यपदार्थ खरेदी टाळावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *