वर्धेत होणार उमेदचा मॉल, पालकमंत्री डॉ भोयर यांनी मानले ग्रामविकास मंत्री गोरे यांचे आभार

प्रतिनिधी : दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत कार्यरत महिलांच्या स्वयं साहाय्यता गटामार्फत निर्मित वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी वर्धेत उमेद मॉल साकारण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नांमुळे वर्धेतील महिला बचत गटांना भेट मिळाली आहे. उमेद मॉल मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री डॉ भोयर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेवून आभार मानले.

जिल्ह्यात बचत गटाची चळवळ सक्षमपणे उभी झाली आहे. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून रोजगार व स्वयं रोजगाराची कास धरली आहे.

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात १४ हजार ३०९ स्वयं साहायता समूह, ९५२ ग्रामसंघ व ४९ प्रभाग संघ कार्यरत आहे. समूहातील ग्रामीण महिलांद्वारे १२ हजार ३१० वैयक्तिक व १६५ सामूहिक व्यवसाय सुरू करण्यात आले आहे. उद्योजक महिलांद्वारे निर्मित वस्तूंच्या विक्री व ब्रँडिंगसाठी वर्धिनी ब्रँड विक्रीस उपलब्ध करून देण्यात आला आहे. वर्धिनी ब्रँडचे ब्रँडिंग व पॅकेजिंग करून उमेद मार्ट, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या विविध माध्यमातून विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले. परंतु समूहांना हक्काची जागा नसल्याने उमेद अभियानांतर्गत हक्काची जागा व मॉल देण्यात यावा, अशी मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी १० ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

तसेच राज्य पुन्हा सत्ता आल्यानंतर १ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री श्री. फडणवीस साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली होती. नुकताच शासनाने उमेद अभियानांतर्गत जिल्हा मुख्यालय स्तरावर मॉल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये वर्धेचा समावेश करण्यात आला आहे. नागपूर विभागातून वर्धा व नागपूर येथे हा मॉल उभारण्यात येणार आहे. शहरातील बॅचलर रोड वरील मगन संग्रहालय जवळ जिपच्या मालकीची जवळपास १० हजार स्के. फूट जागा आहे. या जागेवर मॉलची निर्मिती केली जाणार आहे.

पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेवून वर्धाचा समावेश केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *