वर्धा (जिमाका) : इसरो आणि कुप्पम येथील भेटीमुळे बालकांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होऊन ऊर्जा व प्रेरणा मिळेल. भविष्यात विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी तसेच एआय सारख्या प्रगत विज्ञानाला समजून घेण्यास मदत होईल. बाल वैज्ञानिकांनी या भेटीचे सोने करुन आपल्या जिल्ह्यासोबतच देशाचे नाव लौकिक करावे, अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी बंगलोर येथील इसरो व आंध्रप्रदेश येथील कुप्पम येथे शैक्षणिक क्षेत्र भेट सहल आयोजित करण्यात आली आहे. सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी शुभेच्छा देऊन त्यांना बंगलोर कडे रवाना केले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याच संकल्पनेतून ही सहल आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोघरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, वरिष्ठ व्याख्याता संजय नवले, उपशिक्षणाधिकारी रुपेश काबंळे आदी उपस्थित होते.