फडणवीस यांचे मुख्यमंत्र्या सहाय्यता कक्षाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश
प्रतिनिधी/ दं.प्रतापगढचे वारे
वर्धा: समृद्धी महामार्गावरील झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या सात जणांच्या वार्सांना तसेच जखमींना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी ६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन अपघातग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यांच्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या प्रमुखांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील धामणगाव-पुलगाव दरम्यान, सिंदी (मेघे) येथील सोमनक्षे ले-आऊट येथील दुर्गादेवी मंडळाच्या कार्यकर्त्याच्या वाहनाला भीषण अपघात झाला. दुर्गादेवीची मूर्ती आणण्यासाठी शेगाव गेलेल्या कार्यकर्त्यांच्या परतीच्या प्रवासात त्यांच्या बोलेरो वाहनाला ट्रुकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत २५ नागरिक जखमी झाले. तहसीलदारांच्या अहवालानुसार धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहा किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर सावंगी रुग्णालयात १९ जखमींवर उपचार सुरू करण्यात आले होते.
पालकमंत्री डॉ. भोयर यांची संवेदनशील दखल
या दुर्घटनानंतर मृतांच्या कुटुंबावर आलेल्या संकटाची गंभीर दखल घेत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मृतांच्या वार्सांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदारांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिका-यांनी मृत व्यक्तींच्या वार्सांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी अपघातातील मृतांच्या वार्सांसोबतच जखमी झालेल्या सुमारे २५ व्यक्तींच्या कुटुंबांनाही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याबाबत सहानूपूवक विचार करण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या प्रमुखांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिंदी अपघातातील मृतांच्या वार्सांना आणि जखमींना आर्थिक मदत मिळण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.