वर्धा (जिमाका) : राज्य शासन सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर व शेवटच्या घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासोबतच त्यांच्या समस्या व अडचणींचे निराकरण करण्याचे काम करीत आहे. चारमंडळ येथील या जनता दरबारातून सर्वसामान्यांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
सेलू तालुक्यातील चारमंडळ येथील विठ्ठल रुखमिणी देवस्थान येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार शकुंतला पाराजे, गट विकास अधिकारी देवानंद पानबुडे, चारमंडळच्या सरपंच निता शेळके, अशोक मुडे, प्रफुल खोडे, शिवनगरच्या सरपंच किरणताई अंबुलकर आदी, भाऊराव सोनवने, हिरेश्वर डफरे, गुणवंत कडू, सचिन कडू, प्रवीण करडे, देवेंद्र डफरे, वासुदेव करडे आदी उपस्थित होते.
जनता दरबार आयोजित करण्यात आलेल्या विठ्ठल रुखमिणी मंदिराला नुकताच ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला असून या मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मंदिराच्या सभागृहात केवळ धार्मिक कार्यक्रमच नाही तर गावाच्या विकासाचे विविध उपक्रम देखील घेतल्या गेले पाहिजे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे बोलताना म्हणाले. राज्यात मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते.
या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार पिककर्जमाफीची मागणी होत आहे. शासनाने जूनपर्यंत पिककर्ज माफी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे पिककर्ज आहे, अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तलाठी किंवा तहसिल कार्यालयात जमा करावे, जेणे करून त्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.