आष्टी (शहीद) : पुलगाव येथून मोठ्या महादेवाला जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला स्थानिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या वाहनाने धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले तर पाच व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. आष्टी पोलिसांनी बीडीओंचे शासकीय वाहन ताब्यात घेतले.
आष्टी येथील गटविकास अधिकारी हे शनिवारी गावी गेले. दरम्यान, त्यांचे शासकीय एम. एच. ३२ ए. एच. ७२४५ क्रमांकाचे वाहन पंचायत समिती आष्टीच्या आवारात उभे होते. वाहन चालक ताहीत शेख याने दारूच्या नशेत शासकीय वाहन पंचायत समितीच्या बाहेर काढले. ते वाहन राष्ट्रीय महामार्गावर नेले. तळेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाने पुलगाव येथील शिवभक्त मोठ्या महादेवाला दर्शनासाठी जात असलेल्या वाहनाला आष्टी येथील पेट्रोलपंपाजवळ बीडीओंच्या शासकीय वाहनाने जबर धडक दिली.
यात देवानंद रामटेके (वय २५), धर्मानंद ढोके (वय ३०), गणेश डहाके (वय ४२) हे तिघे गंभीर जखमी झाले. तर पाच जण किरकोळ जखमी झाले. अपघाताची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार राजेश जोशी, लिंबा पारेकर यांनी घटनास्थळ गाठले. आरोपी मद्यधुंद वाहन चालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.