वर्ध्यातील ४६ विद्यार्थी विमानाने ‘इसरो’ (ISRO) कडे झेपावणार

वर्धा (जिमाका) : जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४६ गुणवंत विद्यार्थ्यांची बंगलोर येथील ‘इसरो’ (ISRO) आणि कुप्पम (आंध्र प्रदेश) येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी ‘डाएट’ येथे पालक आणि विद्यार्थ्यांची विशेष बैठक पार पडली. विमानाने होणाऱ्या या पहिल्याच शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक संस्था पाहायला मिळाव्यात आणि त्यांच्यातील शास्त्रज्ञ जागा व्हावा, या उद्देशाने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून ही सहल होत आहे.

पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पाठपुराव्यामुळे या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी निधी उपलब्ध झाला असून, सहलीचे संपूर्ण नियोजन अत्यंत उच्च दर्जाचे करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुलांनी विमानाने प्रवास करून अवकाश संशोधनाचे धडे गिरवावेत, हा पालकमंत्र्यांचा मानस या उपक्रमातून पूर्ण होत आहे.

डाएटमध्ये आयोजित बैठकीत प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना प्रवासाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दिनांक १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात ४६ विद्यार्थी, ४ अधिकारी आणि १ वैद्यकीय अधिकारी असा ५१ जणांचा चमू सहभागी होणार आहे. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल फोन न बाळगणे, ओळखपत्र सतत जवळ ठेवणे, विमानातील प्रवासाचे नियम आणि ‘इसरो’ भेटीदरम्यान पाळायची शिस्त याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

प्रवासाचा असा आहे कार्यक्रम : १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता वर्धा येथून नागपूर विमानतळाकडे प्रस्थान. दि. १६ ते १८ फेब्रुवारी इसरो (ISRO) केंद्र भेट, शास्त्रज्ञांशी संवाद आणि कुप्पम येथील वैज्ञानिक प्रकल्प पाहणी. दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:४० वाजता बेंगलोर ते नागपूर असा परतीचा विमान प्रवास. पालकांनी या उपक्रमाबद्दल पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत, असे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *