जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते श्रमशक्ती व असंगठीत क्षेत्रातील सर्वेक्षणाचा शुभारंभ

जिल्हा व राज्याच्या विकासाला हातभार लावणारे सर्वेक्षण, दोन्ही सर्वेक्षणाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन

वर्धा (जिमाका) : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी राज्यात प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंगठित क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या हस्ते करण्यात आला. श्रमशक्ती व असंगठित क्षेत्रातील उद्योग असे दोन सर्वेक्षण होणार आहे. यावेळी दोन्ही सर्वेक्षणाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ.नयना तुळसकर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त मुरलीनाथ वाडेकर, सहाय्यक नियोजन अधिकारी राधाकृष्ण चव्हाण, मुख्याधिकारी विजय देशमुख आदी उपस्थित होते.

श्रमशक्ती सर्वेक्षणाद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या स्थितीचा अचूक आढावा घेण्यात येतो. कौशल्य विकास कार्यक्रमांना दिशा देण्यासोबतच रोजगार निर्मितीच्या प्रभावी योजना राबविण्यासह जिल्ह्याचा आर्थिक व सामाजिक विकासाचा अंदाज तयार करण्यासाठी सर्वेक्षण उपयुक्त ठरते. त्याचबरोबर विविध निर्देशांकांची मोजणी जसे श्रम बल सहभाग दर, कामगार लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगारी दर मोजणीस सर्वेक्षणामुळे हातभार लागतो. श्रमशक्ती सर्वेक्षणासोबत असंगठीत क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण देखील करण्यात येणार असून असंगठीत बिगर कृषी उद्योगांची माहिती संकलित करणारे हे एक महत्त्वाचे सर्वेक्षण आहे. अर्थव्यवस्थेतील असंगठीत बिगर कृषी क्षेत्रातील लहान उत्पादक, व्यापारी आणि सेवा प्रदाता क्षेत्रातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य इत्यादी आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्ये मोजण्यासाठी सर्वेक्षण उपयुक्त आहे. या सर्वेक्षणामुळे असंगठीत क्षेत्रातील उद्योगांचे स्वरूप, आकार, कार्यपद्धती, संसाधने, उत्पादन आणि सेवांचे वितरण, खर्च आणि उत्पन्न यांची माहिती मिळते. या सर्वेक्षणाच्या माहितीचा उपयोग जिल्ह्यातील असंगठीत उद्योगांची माहिती जाणून घेऊन या क्षेत्रातील योजना व धोरणात्मक नियोजन करण्यास उपयुक्त ठरते.

सदर सर्वेक्षण मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. राज्यात हे सर्वेक्षण जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत महास्टाईड प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहे. श्रमशक्ती सर्वेक्षणासाठी निवडलेल्या कुटुंबाची माहिती संकलित करण्यात येणार आहे. संकलित केलेली माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार आहे. श्रमशक्ती व असंगठीत क्षेत्रातील उद्योगांच्या सर्वेक्षणात संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *