एकाच नंबरच्या दोन स्कूट्या! वाहतूक पोलिसांचा दणका

(अभय बेदमोहता) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,सेलू : वाशीम जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच नोंदणी क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या स्कूटर रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले. यामुळे संबंधित वाहनमालकाला विनाकारण दंड भरावा लागल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सेलू तालुक्यातील केळझर येथील शशिकांत (बंटी) माधव इरुटकर यांच्या नावावर एमएच ३२ एई ११५५ क्रमांकाची लाल रंगाची होंडा स्कूटर नोंदणीकृत आहे. मात्र याच क्रमांकाची काळ्या रंगाची दुसरी स्कूटर वाशीम शहरात फिरताना आढळली. दि. १६ जानेवारी रोजी झालेल्या कारवाईत त्या वाहनचालकाने हेल्मेट न घातल्यामुळे वाहतूक पोलिसांनी ई-चलन प्रणालीद्वारे कारवाई केली होती.

विशेष म्हणजे, चलानातील फोटो आणि वाहन क्रमांक सारखाच असल्याने दंडाची नोटीस थेट केळझर येथील इरुटकर यांना प्राप्त झाली. प्रत्यक्षात संबंधित स्कूटर त्या वेळी त्यांच्या ताब्यात असताना त्या मार्गावर गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारामुळे त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

बनावट नंबर प्लेटचा धोका वाहनांवर बनावट किंवा समान क्रमांकाच्या नंबर प्लेट लावण्याचे प्रकार गंभीर गुन्ह्यांशी संबंधित असू शकतात. अशा वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी झाल्यास मूळ वाहनमालकाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.

इरुटकर यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून बनावट नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाहतूक पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संबंधित वाहनाचा शोध घेतला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वाहनमालकांनी वेळोवेळी आपल्या वाहनाचा क्रमांक, आरसी बुक तपशील आणि ई-चलनची स्थिती तपासावी. अनोळखी चलन आल्यास त्वरित संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. एकाच क्रमांकाच्या वाहनांचा वाढता प्रकार नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत असून प्रशासनाने यावर कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *