वर्धा(जिमाका) : राज्यातील गरीब, दुर्बल, शेतकरी, शेतमजूर, महिलांसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, महिलांसाठी उज्ज्वला योजना, लाडकी बहीण, लखपती दिदी योजना, गरिबांसाठी घरकुल यासारख्या योजना राबवून प्रत्येक नागरिक महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
सिध्दीविनायक गणपती मंदिर, केळझर येथे पशुचिकित्सालयाचे भूमीपूजन, सेल्डोह येथील पशुचिकित्सालयाचे लोकार्पण, ग्रामपंचायत येथील आपले सरकार सेवा केंद्राचे लोकार्पण व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध लाभाचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी खासदार रामदास तडस, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसिलदार शकुंतला पाराजे आदी उपस्थित होते.