केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे निवेदन

हिंगणघाट : बुटीबोरी ते जाम – हिंगणघाट दरम्यान मेट्रो रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याकरिता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी निवेदन दिले.

या निवेदनावर सकारात्मक विचार करून येत्या बैठकीत जाम पर्यंत ही मेट्रो नेण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे ना. गडकरी यांनी यावेळी वांदिले यांना सांगितले.

श्री अतुल वांदिले यांनी दिलेल्या निवेदनातून म्हटल्यानुसार, हिंगणघाट हे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे राज्यस्तरीय मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. या भागातून मोठ्या संख्येने शेतकरी, उद्योजक, बेरोजगार युवक, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज नागपूरकडे प्रवास करतात. मेट्रो रेल्वे सेवेचा विस्तार झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नागपूर येथे ये-जा करणे सुलभ होईल तसेच सर्वसामान्य नागरिकांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत होईल.

सध्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण व प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाल्यास वाहतुकीवरील ताण कमी होऊन पर्यावरण संरक्षणासही मोठे योगदान मिळेल. यासोबतच स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळेल व परिसराचा सर्वांगीण विकास साधता येईल.

मेट्रो रेल्वे सेवा जाम पर्यंत पोहोचल्यास वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ या तीन जिल्ह्यांतील नागरिकांनाही त्याचा थेट लाभ होईल.

सदर प्रस्तावावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाम परिसरात मेट्रो येण्याबाबत पुढील बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी श्री हेमंत गडकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *