प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पाद्वारे बहार नेचर फाउंडेशनच्या सहकार्याने रिधोरा धरण परिसरात पक्षीनिरीक्षण व स्वच्छता अभियान राबवत जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रिधोरा धरणाच्या जलाशयावर विविध प्रकारच्या पाणपक्ष्यांची नोंद करण्यात आली. यावेळी परिसरात राजहंस या स्थानिक स्थलांतरीत पक्ष्याचा थवा सुमारे ७० च्या संख्येत पाणथळ ठिकाणी दिसून आला. त्यासोबतच चक्रवाक, नदी सुरय, कवड्या खंड्या, पाणकावळा, काळा शराटी, गायबगळा, ढोकरी, शेकाट्या, चिखल्या, टिटवी आदी पाणथळ व दलदलीच्या ठिकाणी आढळणाऱ्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली.
बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी व मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, क्षेत्रसहाय्यक वसंत खेलकर, पद्माकर ठवरी, वनरक्षक राजू ढोबाळे, तुमडाम, बहारचे पदाधिकारी दीपक गुढेकर, राजदीप राठौर, राहुल तेलरांधे, सुरज बोदिले, सुर्वी, सुवीर बोदिले यांचा सक्रिय सहभाग होता.