कोटांबा येथे लोकसहभागातून उभा राहिला आठवणीचा निवारा..! दामिनी कोटंबकर यांचा सामाजिक आदर्श

सेलू : – ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी जपत वैयक्तिक पुढाकारातून उभा राहिलेला प्रेरणादायी उपक्रम कोटांबा गावात साकार झाला आहे. गावातील माजी सरपंच रेणुका कोटंबकर व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले रवींद्र कोटंबकर यांच्या कन्या दामिनी कोटंबकर यांनी लोकसहभागाच्या भावनेतून आणि स्वखर्चाने गावासाठी ‘आठवणींचा निवारा’ उभारून तो ग्रामस्थांना आज समर्पित केला.

सध्या कोटांबा गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू असून, या अभियानात आपलाही काहीतरी सकारात्मक सहभाग असावा, या भावनेतून दामिनी यांनी हा उपक्रम हाती घेतला. शाळेत जाणाऱ्या व बाहेरगावी प्रवास करणाऱ्या मुलांना थांबण्यासाठी जागा, तसेच गावातील ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांना विरंगुळा आणि संवादासाठी एक सुरक्षित ठिकाण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या निवार्‍याची उभारणी करण्यात आली.

या निवार्‍याच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे व ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. दामिनी कोटंबकर या सध्या नोकरी करत असून, पुणे येथील ‘भूमी’ या अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतही त्या सक्रिय आहेत. आई-वडिलांकडून मिळालेल्या सामाजिक संस्कारांमुळेच हे कार्य हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. हा उपक्रम केवळ बांधकाम नसून गावावरच्या प्रेमाची, सामाजिक जाणिवेची व लोकसहभागाची जिवंत आठवण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *