समृद्धीवर कारचा अपघात:आई, मुलाचा मृत्यू, ठाणेकडून नागपूरकडे जाताना घडला अपघात

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : नागपूरच्या दिशेने जाणारी कार पुढे असलेल्या कंटेनरला धडकून घडलेल्या भीषण अपघातात मुलगा तसेच आईचा मृत्यू झाला. हा अपघात १ फेब्रुवारी रोजी ६.२० वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर चॅनेज क्रमांक ३९/९०० परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद हनुमंत कणबर्गी (वय ५६) व त्यांची आई आशाल्ता हनुमंत कणबर्गी (वय ८४) रा. ह.मु. रामनगर नागपूर अशी मृतांची नावे सांगण्यात आली. विवेकानंद कणबर्गी आणि आशाल्ता कणबर्गी हे एमएच ०५ एएक्स ७६१२ क्रमांकाच्या कारने ठाणे ते नागपूर महामार्गाच्या मिडल लेनने जात होते.दरम्यान चॅनेज क्रमांक ३९/९०० नागपूर कॉरिडॉर येथे आल्यानंतर कारने मिडल लेनवर पुढे चालत असलेल्या एमएच ४६ सीएल १५५६ क्रमांकाच्या कंटेनरला मागाहून जबर धडक दिली. त्यामध्ये आशालता हनुमंत कणबर्गी (वय ८४) यांचा जागीच मृत्यू झाला.

कारचा चालक विवेकानंद हनुमंत कणबर्गी (वय ५६) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना कारच्या बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेने सावंगी रुग्णालय येथे उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्र जाम येथील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांच्यासह चंद्रकांत जीवतोडे, सतीश नैताम, भूषण टोंग, विकास काकडे, उद्धव डोंबाळे यांनी भेट दिली. अपघात स्थळी पाहणी करत मदत कार्य केले.

अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. अपघातामुळे काही वेळ वाहतूक प्रभावीत झाली होती. वाहन बाजूला करत सुरक्षित ठेवल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *