देवळी : देवळी परिसरातील महालक्ष्मी स्टील प्लांटमधून होत असलेल्या वायू प्रदूषणाविरोधात देवळीकरांचा संताप उफाळून आला असून युवा संघर्ष मोर्चा, देवळी व क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या वतीने गुरुवारी महालक्ष्मी स्टील कंपनीवर मोर्चा काढण्यात आला. युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष देवळी न प चे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात देवळी शहरातून कंपनीपर्यंत हा मोर्चा काळी छत्री, काळे मास्क, काळ्या फिती लावून काढण्यात आला.
मोर्चामध्ये जेष्ठ नागरिक, डॉक्टर, महिला तसेच युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. प्रदूषण बंद करा देवळीकरांच्या आरोग्याशी खेळ नको अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी नागरिकांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
मोर्चा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर नगराध्यक्ष किरण ठाकरे, डॉ. प्रसाद फुटाणे, डॉ. सचिन तडस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत औद्योगिक प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम अधोरेखित केले. कंपनीच्या पॉवर प्लांट व स्टील प्लांटमधून मोठ्या प्रमाणात फ्लाय अँश काळी राख तसेच कार्बन व लोखंडी धूळ हवेत पसरत असल्यामुळे देवळी शहरातील जनजीवन प्रभावित होत असल्याचे सांगण्यात आले.
या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, दमा तसेच हृदयविकाराचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. शहरातील घरांच्या छतांवर, रस्त्यांवर तसेच सोलार पॅनेलवर राखेचा थर साचून परिसरातील शेतीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, कंपनी प्रशासनाच्या वतीने श्यामसुंदर मुंदडा उपाध्यक्ष, एसएमडब्ल्यू स्टील प्लांट, देवळी, दास एचआर हेड व प्रकाश कोहळे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी उपाध्यक्ष श्यामसुंदर मुंदडा यांनी सांगितले की पॉवर प्लांट नुकताच सुरू करण्यात आला असून सध्या त्याचे टेस्टिंग सुरू आहे. महालक्ष्मी कंपनीमधून होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांनी २० दिवसांचा अवधी द्यावा या कालावधीत आवश्यक उपाययोजना करून प्रदूषण आटोक्यात आणण्यात येईल. तसेच रेल्वेमार्गे येणाऱ्या कोळशाच्या डम्पिंग यार्डमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबाबत रेल्वे बोर्डाशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात वीस दिवसांच्या आत प्रदूषणावर तात्काळ नियंत्रण आणावे बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी देवळी शहरात रिअल-टाइम एअर क्वालिटी मॉनिटरिंग बोर्ड बसवावा तसेच प्रदूषणामुळे बाधित नागरिकांच्या उपचाराचा खर्च सी एस आर निधीतून उचलावा अशा मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कंपनीचे कन्सेंट टू ऑपरेट रद्द करण्याची मागणी करण्यात येईल तसेच तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी प्रवीण कात्रे, अशोक पवार, दादाराव मून, गौतम पोपटकर, मंगेश वानखेडे, हारून तवर, सरपंच विनोद दांडे, मोनिका खाडे, स्वाती धांडे, शिल्पा मुरार, भारती झोरे, गौरव खोपाळ, निखिल काशीकर, दिलीप वाघमारे, सविता घुबडे याच्या सह मोठ्या प्रमाणात देवळी कर नागरिक उपस्थित होते.