या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला व त्यांच्या आरोग्यविषयक आणि शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून त्यांनी व्यवस्थापनास काही महत्त्वाच्या सूचना केल्या. विषबाधेसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळेतील स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वयंपाकघरातील स्वच्छता, भोजन व्यवस्थापन आदी बाबींवर विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
खासदार काळे यांनी विद्यालयातील राहण्याच्या व अभ्यासाच्या सुविधा, आरोग्य तपासणी यंत्रणा, स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, आहाराची गुणवत्ता, वीज व इतर मूलभूत सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. शाळेतील व्यवस्थापनाशी संवाद साधून त्यांनी विचारले की, कोणत्या सुधारणा किंवा सुविधा आवश्यक आहेत, याची माहिती प्रशासनाने द्यावी. “विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची आणि सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा तत्काळ पुरवाव्यात. केंद्र सरकारच्या माध्यमातून या बाबतीत आवश्यक पाठपुरावा करून मी स्वतः लक्ष घालीन,” असे आश्वासन खासदार काळे यांनी यावेळी दिले.
तसेच त्यांनी सांगितले की, शाळेच्या इमारतीच्या दुरुस्ती, सुरक्षा उपाय, ग्रंथालय,वसतिगृहाची स्थिती यासंबंधी जर काही मागण्या असतील तर त्या लेखी स्वरूपात द्याव्यात, त्यावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही खासदार अमर काळे यांनी सांगितले. या भेटीदरम्यान शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद उपस्थित होते.