पदयात्रेत तुषार गांधी लोकांशी थांबून संवाद साधतात, झाडाखाली बसून त्यांच्यासोबत चहा पितात. ‘गांधींचा पणतू कुठाय?’ असे विचारत ८५ वर्षांची आजी रणरणत्या उन्हात त्यांना शोधत आली. एक वयस्क शेतकरी दुपारच्या विश्रांतीत हॉलमध्ये त्यांना भेटून मोकळ्या-तोकळ्या शब्दांत पावसामुळे झालेल्या सोयाबीनच्या नुकसानीची व्यथा सांगतो. आपली कैफियत गांधींच्या पणतूला सांगता आली याचं समाधान त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर झळक होतं.
हम भारत के लोग च्या माध्यमातून संविधान सन्मान पदयात्रा विदर्भातून नागपूर ते सेवाग्राम आश्रम पर्यंत, ०२ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान संपन्न
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा – महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी अतिशय साधी राहणी, लोकांमध्ये सहजगत्या मिसळून जाण्याचा स्वभाव आणि महात्मा गांधींची विरासत जपणारा आजचा आश्वासक चेहरा. सामाजिक न्याय, सलोखा आणि संविधानाच्या रक्षणासाठी तुषार गांधींनी नागपूरच्या दीक्षाभूमीपासून वर्ध्याच्या सेवाग्राम येथील बापुकुटीपर्यंत पाच दिवसांची पदयात्रा केली. गांधी आणि आंबेडकरांच्या मार्गावर चालण्यासाठी त्यांनी लोकांना ‘साद’ घातली आणि हजारो लोक पाऊस, ऊन व दसन्याच्या सणाचा विचार न करता २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या काळात विदर्भातील रखरखत्या उन्हात चालले.