प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सोमवार, १२ जानेवारी रोजी ‘स्वामी विवेकानंदांचे जीवन व विचार’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात विश्वभारती विश्वविद्यालय, शांतिनिकेतन येथील सेवानिवृत्त प्रो. रामेश्वर मिश्र म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी भारतीय साधना जगासमोर प्रभावीपणे सादर केली. त्यांनी भारताची तात्त्विक परंपरा व सामाजिक पार्श्वभूमी परदेशात परिचित करून दिली.
स्वामी विवेकानंदांना युवकांची ओळख दृढ मन आणि दृढ शरीर अशी असावी, अशी अपेक्षा होती. त्यांनी युवकांना जागृतीचा संदेश देत सक्रिय होण्याचे आवाहन केले. आपल्या ऑनलाइन व्याख्यानात प्रो. मिश्र यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारदर्शनाच्या संदर्भात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताची चर्चा केली. शिकागो येथे ‘बंधूंनो आणि आणि भगिनींनो’ या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या ऐतिहासिक भाषणाची जगभर चर्चा झाली, असे त्यांनी नमूद केले.
वेदांत व उपनिषदांच्या तत्त्वांचा उल्लेख करत प्रो. मिश्र यांनी सांगितले की रामकृष्ण मिशनची स्थापना करून स्वामी विवेकानंदांनी देश-विदेशात या विचारधारांचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी विवेकानंदांच्या भारतीय दृष्टिकोनाची व धर्मविषयक विचारांची चर्चा करताना सांगितले की अद्वैत वेदांतानुसार जीव आणि ईश्वर यांच्यात कोणताही भेद नाही. ‘उठा आणि जागे व्हा’ या त्यांच्या संदेशाने युवकांना प्रेरणा मिळाली. वेदांताचा जितका प्रभावी उपयोग स्वामी विवेकानंदांनी केला, तितका अन्य कोणी केला नाही. त्यांचे चिंतन आजच्या युवकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते असे ते म्हणाले. कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना बौद्ध अध्ययन विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. कृष्ण चंद्र पांडे यांनी सांगितले की रामकृष्ण परमहंसांचे विचार स्वामी विवेकानंदांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, अद्वैत वेदांत व आर्य समाज यांचा सविस्तर आढावा घेत विवेकानंदांच्या आध्यात्मिक चिंतनावर प्रकाश टाकला.
साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. अवधेश कुमार म्हणाले की स्वामी विवेकानंद धर्माला जीवनाचा पर्याय मानत. चारित्र्यवान व श्रद्धावान मनुष्य घडवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णचंद पांडे यांनी केले, तर प्रा. अवधेश कुमार यांनी आभारप्रदर्शन केले.