लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांची ई-केवायसी करतांना चूकीचे पर्याय निवडण्यात आल्याने अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. परंतू जिल्ह्यातील एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या. शासनाच्या सूचनेप्रमाणे लाभ बंद झालेल्या प्रत्येक महिलेच्या अर्जांची फेरतपासणी करा आणि त्यांना पुन्हा लाभ सुरु होण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर विशेष शिबिरे आयोजित करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

ई-केवायसीत पर्याय निवडतांना गल्लत झाल्याने अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा व सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसंगे तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते. लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ३ लाख २० हजार महिलांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील २ लाख ९९ हजार महिला पात्र ठरल्या होत्या.

त्यानंतर केलेल्या तपासणीत ३५ हजार महिला अपात्र ठरल्या. त्यामुळे ई-केवायसी पुर्वी जिल्ह्यात २ लाख ८८ हजार १११ महिला लाभासाठी पात्र होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या ई-केवायसी मध्ये चूकीचे पर्याय निवडल्याने अनेक महिला अपात्र ठरल्या आहे. अशा सर्व महिलांच्या अर्जाची फेरतपासणी व फेर ई-केवायसी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. राज्यस्तरावरून ई-केवायसीमुळे अपात्र झालेल्या महिलांची यादी जिल्ह्यास प्राप्त होणार आहे. त्या-त्या तालुक्यांना यादी देण्यात यावी.

ग्रामस्तरावर अपात्र महिलांची फेरतपासणी करावे.त्यासाठी विशेष शिबिरे घेतली जावी. याकामाकरीता अंगणवाडी सेविकांना नेमण्यात आले असले तरी तलाठी व ग्रामसेवक यांची मदत घ्या. शहरी भागासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सेवा घ्या. महिला व बालविकासच्या पर्यवेक्षकांनी या कामावर दैनंदिन नियंत्रण ठेवावे आणि संबंधित गटविकास अधिकारी यांनी फेरतपासणीचे काम कालमर्यादेत पुर्ण करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. महिलांनी आधारकार्ड व मोबाईल क्रमांक द्यावा ई-केवायसीत महिलांचे अर्ज बाद झाले असले तरी फेरतपासणीनंतर ते पुन्हा पात्र होणार आहे. त्यामुळे लाभ बंद झालेल्या महिलांनी भीती बाळगू नये. लाभ बंद झालेल्या महिलांनी आपले आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *