वर्धा (जिमाका) : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते साटोडा ग्राम पंचायत येथे ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या नागरी सुविधा व जनसुविधाच्या ४ कोटी ११ लक्ष रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी खासदार रामदास तडस, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, संजय गाते, साटोडाचे सरपंच गौरव गावंडे, उपसरपंच प्रिती शिंदे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत साटोडा येथील नागरिकांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याकरीता शुध्दपेयजल यंत्र ९ लक्ष ९७ हजार, ग्राम पंचायत संरक्षण भिंत ३ लक्ष ३२ हजार या कामांसह नागरी सुविधा, जनसुविधा अंतर्गत गावातील रस्ते, नाल्यांची अशी एकुण ४ कोटी ११ लक्ष रुपयांची कामे करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व शुध्द पिण्याचे पाण्याचे उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक हा विकासापासून दूर राहणार नाही याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.