वर्धा (जिमाका) : वर्धा शहरालगतच्या वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच शहरातील प्रदुषणात देखील वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने घनकचऱ्याचे नियोजन करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यासाठी शहरालगतच्या ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे, काही अडचणी व तक्रार असल्यास समितीस सादर कराव्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वर्धा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायत मधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, तहसीलदार संदीप पुंडेकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.