सिकलसेल तपासणी विशेष अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : सिकलसेल आजाराचे अधिक प्रमाण असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल तपासणी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्याचा देखील समावेश आहे. आरोग्य विभागाने काटेकोरपणे नियोजन करुन जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवा, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते अरुणोदय सिकलसेल ॲनेमिया अभियान, बालवयीन असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ आणि आयपीएचएल प्रयोगशाळेचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले, सिकलसेल तपासणी अभियानात पुढाकार घेऊन कामे करा. योग्य उपचार, समुपदेशन व नियमित औषधोपचाराने सिकलसेलला प्रतिबंधित करता येईल. सिकलसेल आजाराचे लवकर निदान, रुग्णांना योग्य उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून जिल्ह्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या. आयपीएचएल प्रयोगशाळेमुळे आजारांच्या तपासण्या जलदगतीने होतील. नागरिकांनी सिकलसेल तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात डॉ. सुमंत वाघ यांनी सांगितले, जिल्ह्यात ४ लाख ८५ हजारांवर सिकलसेल तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १ हजार २४५ रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती, रुग्णांना मोफत औषधे, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ. भोयर व मान्यवरांच्या हस्ते सिकलसेल अभियानात उत्कृष्ट काम करणारे तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, सिकलसेल स्वयंरोजगार सेवक, आशासेविका आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजाराची माहिती देणारे चाईल्ड हुड इंटीग्रेड प्रोग्राम बुकचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी मानले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *