अखेर एका समवयस्क वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

समुद्रपूर : एका समवयस्क वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात वर्षभरापासून पाच वाघांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. आमदार समीर कुणावार यांनी या वाघांना पकडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली होती.

या वाघांच्या कुटुंबातील एका समवयस्क वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सलग ११ दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर गुरुवारी ४ वाजताच्या सुमारास डोंगरगाव खुर्सापार शिवारात ही कारवाई यशस्वी झाली. आमदार समीर कुणावार यांनी पथकाची भेट घेत त्याचे अभिनंदन करीत कौतुक केले.

समुद्रपूर तालुक्यात १२ वाघाचा हैदोस सुरू होता. त्याकरिता आमदार समीर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री नाईक यांची भेट घेऊन सदर वाघांना पकडण्यासाठी परवानगी सुद्धा मिळवून दिली होती. शेतकरी राजू भुजाडे यांच्या शेतात दुपारी १२ वाजताच्या सुमारास या वाघिणीच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार झाला होता. दरम्यान ही माहिती वनविभागाला दिल्यावर घटनास्थळी सापळा रचण्यात आला. सायंकाळी ४ वाजता ही वाघिण शिकारीच्या ठिकाणी येताच वनविभागाने कारवाई करत जेरबंद केले.

वनविभागाच्या विशेष पथकाने तब्बल ५५ कर्मचाऱ्यांच्या सहभागाने जंगल परिसरात व्यापक सर्च ऑपरेशन राबविले होते. वाघ सतत ठिकाण बदलत असल्याने मोहिमेत अनेक अडथळे येत होते. मात्र आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन कॅमेरे, ट्रॅकिंग तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अखेर संबंधित वाघिणीला बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून तिला पुढील उपचार व निरीक्षणासाठी वनविभागाच्या ताब्यातील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

उर्वरित वाघीण व तिचे दोन समवयस्क शावक यांचा शोध अद्याप सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार समीर कुणावार यांनी संपूर्ण टिमचे कौतुक केले. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला असून, वनविभागाच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या वाघाला पेंच व्याघ्रप्रकल्पात नेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *