दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांना अटक

हिंगणघाट : तालुक्यातील वडनेर सर्कलमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाई करत २२ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी गोपनीय माहितीवरून, वडनेरजवळ टिप्पर (क्रमांक एम एच ३१ सी क्यू ० ६६९) व त्यात असलेले तीन ब्रास रेती वाळू जप्त केली. टिप्पर चालक टिप्पर सोडून पसार झाला. या कारवाईमध्ये पोलिसांनी १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या कारवाईमध्ये ऑपरेशन निशाणा अंतर्गत वडनेर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. पोलिसांना विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉली अवैध वाळू वाहतूक करताना आढळला. या कारवाईमध्ये ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रविवारी झालेल्या दोन्ही कारवाईमध्ये वडनेर पोलिसांनी टिप्पर व ट्रॅक्टर सोबत वाळू असा २२ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील नायक यांच्या मार्गदर्शनामध्ये वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घनश्याम पाटील व सहकारी पोलीस चमूने केली. या कारवाईमुळे वडनेर परिसरात चोरी करून वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *