प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा हे शहर महात्मा गांधींच्या तत्त्वांचे मंदिर, शिक्षणाचे केंद्र आणि ग्रामीण विकासाचे प्रतीक आहे. हे शहर माझ्या हृदयात आहे. वर्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर कृतीचे वचन आहे. शहराच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि स्वच्छता यावर तात्काळ काम सुरू करणार आहोत. पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहणाऱ्या भागांना शुद्ध स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करू. प्लास्टिकमुक्त वर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करू, हरित उद्यान आणि पर्यटन स्थळे विकसित करून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सर्वांच्या सहकार्याने वर्ध्याचे विकासाचे स्वप्न साकार करू, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केले.
जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मकरसंक्रांती स्नेहमिलन पर्वावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधीर पांगुळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला. वर्धा शहराच्या विकासाबाबत एक चित्रफित दाखविण्यात आली. त्यामध्ये कोणकोणत्या भागात विकासाची गरज आहे हे दाखविण्यात आले. यावर नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत वर्धेचा विकासासाठी जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे अभिवचन दिले. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संचालन करत आभार प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोठारे यांनी मानले. यावेळी सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री म्हणाले की, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांनी पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने कार्य करून गांधी, विनोबांची भूमी असलेल्या वर्धेचा चेहरा मोहरा बदलावा व शहराचा सर्वांगीण विकास करावा, असे प्रतिपादन केले.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये सतिश विलासराव मिसाळ, उज्वला संजय पेठे, विजय दिलीप उईके, शेख नाजीया शेख महेमूद, सचिन विनोदराव होले, सोनल संदिप त्रिवेदी, वंदना प्रकाश चामटकर, सोहनसिंग तेजसिंग ठाकुर, निशा रविंद्र गोसावी, विलास गंगाधार आगे, प्रदिप मनोहर जग्यासी, शेख तरन्नुम शेख, शैलेन्द्र आनंदराव झाडे, श्वेता वरुन पाठक, वैष्णवी गौरव मेघे, शुभांगी नरेश कोलते, वंदना सुधीर भुते, स्वाती अखिलेश गव्हाणे, मोहिनी रामेश्वर आडे, यशवंत नामदेवराव झाडे, दिपीका दिपक आडेपवार, संतोष जसवंतसिंग ठाकुर, स्नेहा आशिष आकरे, प्रियंका कूणालराव खंगार, सोनाली तडस, सुरेश गुलाबचंद आहुजा, जयश्री किशोर आगरकर, राखी पांडे, नदिम अतर अब्दुल सत्तार, अर्चना सुनिल सोमवंशी, परवेज हसन खान, कैलास बंसी राखडे, मेघना ऋषिकेश त्रीमले यांची उपस्थिती होती.