समाजातील गरीब, दुर्बळ घटकातील नागरिकांना आधार देण्याचे काम – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जिल्ह्यात सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. गोरगरीब, दुर्बळ घटकातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्यांना आधार देण्याचे काम शासनाकडून सातत्याने सुरू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

विकास भवन येथे सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते देण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसीलदार संदीप पुंडेकर, समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, सहायक आयुक्त अंकुश केदार, निलेश पोहेकर, निलेश किटे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले, सततच्या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तातडीची मदत शासनाने जाहीर केली असून राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचे ते म्हणाले.

दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १ ऑक्टोबर पासून २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून सेवा पंधरवड्यातून योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *