सुरक्षेच्या शपथसह ग्राहकांना उत्तमोत्तम सेवेचा संकल्पप्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : महावितरणच्या कार्यसंस्कृतीत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘प्रकाशदूता’च्या म्हणजेच लाईनमनच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट विभागात ‘राष्ट्रीय लाईनमन दिन’ अत्यंत उत्साहात आणि भारदस्त वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात लाईनमन बांधवांनी आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करत ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
वर्धा येथील नागपूर रोडवरील एस.बी.एम. हॉल येथे वर्धा विभागातर्फे आयोजित सोहळ्याचे अध्यक्षस्थान वर्धा मंडळाच्या अधीक्षक अभियंता सौ. स्मिता पारखी यांनी भूषविले. यावेळी विद्युत निरीक्षक संजय आंबेकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विविध क्रीडा स्पर्धांनी झाली, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या जोशात सहभाग नोंदविला. याप्रसंगी सेवा निवृत्त होणारे जनमित्र चंद्रकांत नाईक, अनिल आवरकर आणि वरिष्ठ तंत्रज्ञ अंबिका चहांदे यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात पारखी यांनी, ‘लाईनमन हे महावितरणचा कणा आहेत. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन ग्राहकांना उत्तम सेवा पुरविणे, हेच आपले मुख्य ध्येय असायला हवे,’ असा मोलाचा कानमंत्र दिला.
आर्वी विभागातही हा दिवस उत्साहात साजरा झाला. कार्यकारी अभियंता प्रशांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला रोशनी फाऊंडेशन व माधव नेत्रालयाचे श्री. जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यादरम्यान माधव नेत्रालयातर्फे आयोजित नेत्रतपासणी शिबिराचा अनेक कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. तसेच, श्री. जैन यांनी उपस्थितांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले. या सोहळ्यात आर्वी विभागातील सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
हिंगणघाट विभागातर्फे माहेश्वरी पंचायत भवन येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात शहरातून काढलेल्या भव्य बाईक रॅलीने झाली. कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप घोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांची लाईनमन दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देणारी ध्वनीफीत दाखविण्यात आली. तसेच, मान्यवरांच्या हस्ते प्रकाशदूत जनमित्रांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या सर्व सोहळ्यांमध्ये महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेची सामूहिक शपथ घेऊन भविष्यात अधिक कार्यक्षमतेने काम करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट विभागातील सर्व संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.