जिल्हा नियोजनचा संपूर्ण निधी मार्चअखेर खर्च होईल याची दक्षता घ्या : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा(जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेतून विभागांना विविध विकास कामांसाठी निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहे. त्यामुळे विभागांनी आपल्यास्तरावर मंजूर कामे व निधीचा आढावा घेऊन मार्च अखेरपर्यंत सर्व निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खा.अमर काळे, आ. दादाराव केचे, आ.समीर कुणावार, आ.राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, नियोजन विभागाचे उपायुक्त अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजूरवार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत ४१२ कोटी रुपये मंजूर आहे. डिसेंबर अखेर खर्चाची टक्केवारी फारशी चांगली नाही. विभागांना निधीचे वितरण करण्यात आले आहे. आर्थिक वर्षातील शिल्लक कालावधी पाहता खर्चाची गती वाढविणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *